गुरुवार, ५ जून
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून सुविधा निर्माण करून दिली असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.
इंद्रजीत थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते व माजी कृषी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सहा वर्षाच्या कृषीमंत्री पदाच्या काळात अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या असून याच कालावधीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक शेती उत्पन्न करणारे राज्य ठरले होते.
कृषी विद्यापीठ बांधावर, महापीक अभियान, मागेल त्याला शेततळे, शिवार फेरी असे अनेक उपक्रम आमदार थोरात यांच्या कार्यकाळात राबवले गेले. शेती संबंधीच्या सर्व प्रश्नांची जाण असलेले विधिमंडळातील ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच यापूर्वीही शेती संदर्भाच्या विविध योजना ऑनलाईन करण्यासाठी यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून शेतकऱ्यांना मदत केली आहे.
२०२४-२५ या खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, तूर, कांदा या सर्व पिकांची एक रुपयात पीक विमा नोंद होणार असून याकरता यशोधन कार्यालयात स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. येथे इंटरनेटसह सर्व सुविधा असून शेतकऱ्यांनी त्यासाठी आपल्या शेतीचा सातबारा व ८ अ, आधार कार्ड, बँक पासबुक, सामायिक क्षेत्र असल्यास संमती पत्र ही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत सुविधा सुरू राहणार असून १५ जुलै २०२४ ही अंतिम तारीख आहे.
तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.