बुधवार, १० जुलै
न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिपण्णी करत दहा कोटी रुपये खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे.
कदम यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्याविरुद्ध मंगळवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलाबा पोलीस पुढील तपास करत आहे.
माजी आमदार रमेश नागनाथ कदम यांच्या तक्रारी नुसार २०१४ ते २०१९ यादरम्यान दहिसर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह लाच लुचपत प्रतिबंध कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात कदम यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना पोलीस बंदोबस्तात न्यायालयीन सुनावणीसाठी कदम यांना सत्र न्यायालयात आणण्यात येत असताना २१ जानेवारी २०१६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास न्यायालयाच्या प्रवेशद्वारात विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी कदम यांच्याकडे रागाने बघत जातीवाचक विधान केले.
‘तु जे पैसे खाल्लेत त्यातील दहा करोड रुपये मला दे, पैसे दिले नाही तर तू जेलमधून कधीच सुटणार नाही, अनेक वर्षापर्यंत जेलमध्ये राहावे लागेल’, असे म्हणत धमकाविण्याचा कदम यांचा आरोप आहे. घटनेमुळे गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी देखील हजर असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
न्यायालयीन कोठडीत असल्याने सरकारी वकील चव्हाण विरुद्ध तक्रार केल्यास न्याय मिळेल याची आशा नसल्याने आता उशिरा फिर्याद देत असल्याचे कदम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.



