विशेष प्रतिनिधी | मुंबई
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुकेश अंबानींच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आघाडीचे नेते उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलले असून विरोधी पक्षातील सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. इंडिया आघाडीबरोबर असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला सातत्यानं टक्कर देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तान मुंबईत आल्या आहेत. विवाह सोहळ्याचं निमित्त असलं तरी या दौऱ्यात राजकीय रणनीती देखील आखण्यात आली. अशातच बॅनर्जी यांनी महाविकास आघाडीबाबत मोठी घोषणा केली आणि आघाडीच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले.
त्या म्हणाल्या, सीपीएम, तृणमूल बंगालमध्ये एकत्र येणं कठीण आहे. सीपीएमविरोधात आम्ही लढलो. त्यामुळे बंगालमध्ये एकत्र येणार नाही. २५ जून हा संविधान हत्या दिन म्हणून जाहीर करणाऱ्या मोदी सरकारवर त्यांनी कठोर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही चर्चा न करता संविधानाची हत्या केली, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत आल्यानंतर ठाकरे आणि पवार यांना भेटल्या. काँग्रेसमधील महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्यांना फारसं ओळखत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची भेट झाली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पहिल्यांदाच मुंबईत आल्या आहेत. या दौऱ्यात ममता बॅनर्जी या शरद पवार यांची तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि देशातील विविध प्रश्नांबाबत ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विरोधी पक्षांची आघाडी अधिक मजबूत करता येईल आणि भारतीय जनता पक्षाला संसदेत कशा पद्धतीने टक्कर देता येईल, याची रणनीती या भेटीमध्ये अधिक ठळकपणे ठरवली गेल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये सुरुवातीला ममता बॅनर्जीही सामील झाल्या होत्या. मात्र, पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना त्या आपल्या विरोधक मानत असल्यामुळे त्या या आघाडीत राहिल्या नव्हत्या. निवडणुकीच्या निकालानंतर त्या पुन्हा एकदा इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष बनल्या. दहा वर्षानंतर संसदेमध्ये विरोधी पक्षांची मजबूत ताकद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालंय. यापार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीत होणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबरील भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.


