शनिवार १३ जुलै
खरेदी केलेल्या शेत जमिनीची रजिस्ट्री करण्याकरिता लाचेची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकासह दोन मुद्रांक विक्रेत्यांवर लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी शंकरराव उत्तरवार (दुय्यम निबंधक, उपनिबंधक कार्यालय हदगाव), मुद्रांक विक्रेता खासगी इसम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर आरोपींची नावे असून नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने मौजे हदगाव (नांदेड) येथे २० गुंठे शेत जमीन खरेदी केली होती. या शेत जमिनीची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराने सोमवारी (ता. ८ जुलै) हदगाव येथील उपनिबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार यांची भेट घेतली असता त्यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्कासह तक्रारदाराकडे १ लाख ९९ हजार रुपयांची मागणी केली.
दुय्यम निबंधक उत्तरवार नोंदणी व मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त लाच मागणी करत असल्याची तक्रारदाराची खात्री झाल्याने त्याने नांदेडच्या लाच लुचपत विभागाकडे शुक्रवारी (ता. १२ जुलै) तक्रार केली. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता लोकसेवक उत्तरवार यांनी शेत जमिनीची रजिस्ट्री करण्याकरिता नोंदणी व मुद्रांक शुल्कासह पंचासमक्ष १,९९०००/- रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती उत्तरवार यांनी चार हजार रुपये कमी करत १,९५०००/- हजार रुपयांची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम मुद्रांक विक्रेता समीउल्ला अजमतउल्ला शेख याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानंतर लगेचच लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा लावला असता आरोपी समीउल्ला अजमतउल्ला शेख याने लाचेची रक्कम स्वीकारत ती दुसरा मुद्रांक विक्रेता शेख अबूबकर याचे जवळ दिली. त्यानंतर तक्रारदाराला नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्याची १,१३,४०० रुपयांची पावती देण्यात आली. या प्रकरणात दुय्यम निबंधक उत्तरवार यांनी तक्रारदाराकडे ८१६०० रुपयांची लाचेची मागणी करून वरील आरोपीमार्फत लाच घेतल्याचा गुन्हा तिघा आरोपीं विरोधात हदगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


