गुरुवार, १८ जुलै
अवैध धंद्यांवर कारवाईचा थातूरमातूर फार्स करणाऱ्या संगमनेर पोलिसांनी केलेल्या दोन कारवाया चर्चेचा विषय ठरल्या आहे. शहर पोलिसांनी दोघा गांजा ओढणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. गांजा ओढणारे पोलिसांना सापडतात मात्र विकणारे पोलिसांना सापडत नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ असलेल्या गांजाचे सेवन केल्याच्या कारणावरून पांडुरंग सावळीराम अस्वले (वय ४९ वर्ष नॅशनल शाळेजवळ, कोल्हेवाडी रोड, संगमनेर) आणि राजेश सोमनाथ दिघे (वय २९ वर्ष, शिवरामनगर, कासारवाडी रोड, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा आरोपींची नावे आहे.
या दोघांविरोधात अनुक्रमे पोलीस कॉन्स्टेबल विशाल रामदास कर्पे आणि पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास धर्मनाथ शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरमध्ये तब्बल चार पोलीस ठाणे असून पोलीस उपाधीक्षकांचे कार्यालय देखील शहरात आहे. असे असताना देखील शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. या अवैध व्यवसायांना पोलीस यंत्रणेचे पाठबळ मिळत असल्याने कायद्याची कोणतीही भीती न बाळगता हे व्यवसाय सुरू आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी बुधवारी आषाढी एकादशी आणि मोहरमच्या दिवशी म्हाळुंगी नदीपात्राजवळ दोघा गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई केली. गांजा ओढणारे पोलिसांना सापडतात मात्र गांजा विकणारे पोलिसांना सापडत नाही ही आश्चर्याची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे अनेक मोठ्या गांजाच्या केसेसमध्ये संगमनेर कनेक्शन समोर येऊन देखील शहरातील गांजा विक्री सुरूच आहे.
‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने शहरातील शक्तिमान टॉवर्स येथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रकाश टाकल्यानंतर देखील पोलीस यंत्रणेला कारवाईसाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. या ठिकाणी देखील गांजा सिगारेट विक्री होत असल्याचे महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वृत्तात म्हटले होते.


