सोमवार, ०५ ऑगस्ट
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समृद्ध विचारांचे वारसदार असलेले काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनालयाकरिता अध्यायावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता संगमनेर तालुक्यातील बारा गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालयाकरता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला गेला असल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाल्या, तालुक्यातील युवकांशी साधलेल्या युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. याकरता आमदार थोरात व आपण पाठपुरावा केला. संगमनेरमध्ये वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे.
संगमनेर तालुक्यातील हा उपक्रम राज्यभरासाठी मॉडेल ठरणार असून यामुळे तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे संगमनेर तालुक्यातील युवक युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी स्वागत केले आहे.
या गावांमध्ये होणार युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी…
संगमनेर खुर्द, चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक, समनापुर, कोकणगाव, राजापूर, डोळासने, तळेगाव दिघे, नान्नज तुम्हाला, डिग्रस, निमगाव बुद्रुक व वेल्हाळे. या बारा गावांसाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


