बुधवार, ०७ ऑगस्ट
वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या एका विद्यार्थिनीवर देवदुताची उपाधी मिळालेल्या डॉक्टरनेच तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर तालुक्यातील घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना ताप तसेच हातपाय दुखत असल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ. कुटे हॉस्पीटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी गेलो. तेथे असलेल्या कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले. तेथे डॉ. रवींद्र कुटे आले. त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले.
तपासणी करत असताना डॉ. कुटे यांनी नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह वर्तन केले. त्याला पीडित विद्यार्थिनीने विरोध केला. दरम्यान विद्यार्थिनीने वडिलांना संपर्क केला असता वडिलांनी डॉक्टरला फक्त औषध देण्यास सांगितले.
यावेळी डॉक्टरने पुन्हा त्या विद्यार्थिनीशी वाद घातला. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. रुग्णालयाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. विद्यार्थिनीच्या मैत्रिणीने या सर्व प्रकाराची व्हिडिओ शूटिंग केली त्यामुळे डॉक्टरने तिला झाडू फेकून मारला.
यावेळी पिडीता व तिच्याबरोबर असलेल्या दोघी प्रचंड घाबरून गेल्या होत्या. त्यानंतर याप्रकरणी पीडीत विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलीसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉ. रवींद्र कुटे व रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पो. नि. नितिन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. कुटे याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस उपनिरीक्षक दादाभाऊ मगरे हे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


