सोमवार, १९ ऑगस्ट
पुणे – विरोधक राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहे, मात्र याआधी ज्यांनी अनेक योजनांमध्ये कोट्यावधीच्या भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील जे नेते तुरुंगात जाऊन आले आहेत, तेच जनतेची दिशाभूल करून आपल्या माता भगिनींचा सरकारवरील विश्वास उडावा यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
पुण्यातील मॉडेल कॉलनी मधील सिल्वर रॉक्स येथे नीलम गोऱ्हे यांनी आपले उद्योजक बंधू मंदार पाठक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. अपर्णा पाठक यावेळी उपस्थित होत्या.
गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. नारळी पौर्णिमेचा आणि रक्षाबंधनाचा आजचा हा दिवस सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, यश, शांती, नवचैतन्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
गोऱ्हे म्हणाल्या, नुकताच राज्य स्तरावर लाडकी बहिण सन्मान योजनेचा शुभारंभ झाला असून, अनेक लक्षावधी महिलांना त्यांचा फायदा मिळालेला आहे. आणि अजूनही कोट्यवधी महिलांना त्याचा फायदा मिळेल. महिलांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टिकोनातून हे सकारात्मक पाऊल आहे. ज्या एकल महिला आहेत, ज्यांना पती किंवा भावाचा आधार नाही अशा महिलांना ही योजना दिलासा देणारी असल्याचं त्यांनी सांगितले.


