रविवार, २५ ऑगस्ट
कल्याणवरून संगमनेरमध्ये यात्रेसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने लांबविण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
अधिक माहिती अशी, पश्चिम कल्याण येथील कौशल्या हरी शिंदे (वय ६० वर्ष) ही महिला संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील आशापीर बाबा यात्रेला जाण्यासाठी कल्याण येथून बुधवारी (२१ ऑगस्ट) संगमनेरमध्ये आली होती. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर बस स्टैंडवर पारेगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने या महिलेला पाठीमागून धक्का देत तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे पेंडल असलेले सोन्याची साखळी लंपास केली.
संबंधित महिला एकटीच असल्याने घाबरून गेली होती. महिलेने भावाच्या घरी पारेगाव बुद्रुक येथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जावयासोबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येत फिर्याद दिली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
नव्या पोलीस निरीक्षकांना चोरट्यांची सलामी
गेल्या पंधरवड्यात शहर पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी स्वीकारला आहे. महाजन यांना शहराची ओळख होण्यापूर्वीच बस स्थानकावर दागिने चोरट्यांनी सलामी दिली असल्याचे बोलले जाते. तसेच दिवसाआड दुचाकी चोऱ्या शहरातून सुरू आहेत पोलीस निरीक्षक महाजन शहरातील या चोऱ्या रोखण्यास यशस्वी होतात की नाही हे येत्या काही दिवसात समजेल.



