शनिवार, २८ सप्टेंबर
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान ४.०”मध्ये संगमनेर शहरासह तालुक्याने दमदार कामगिरी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संगमनेर नगर परिषदेने नगरपरिषद गटात राज्यस्तरावर उत्तेजनार्थ सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. याशिवाय तालुक्यातील घुलेवाडी, गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, खांडगाव, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे, तिगाव या नऊ ग्रामपंचायतींनी अभियानात आपला ठसा उमटविला आहे. राज्यात सर्वाधिक तब्बल साडेपाच कोटी रुपयांची बक्षिसे मिळविणारा संगमनेर एकमेव तालुका ठरला आहे.
एप्रिल २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान ४.०” राज्यात राबविण्यात आले होते. राज्यभरातील तब्बल २२,६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी यात सहभाग नोंदविला. त्रयस्थ यंत्रणेमार्फत विविध गटामध्ये या अभियानाचे मूल्यांकन करण्यात आल्यानंतर शासनाने शुक्रवारी निकाल जाहीर केला आहे.
१ लाख लोकसंख्येच्या आत नगरपरिषद गटात तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेने केलेल्या कामगिरीची दखल घेण्यात आली असून राज्यस्तरावर सहाव्या क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले असून याद्वारे पालिकेला दीड कोटी रुपये मिळणार आहे. संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतींनीही गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानात विविध गटात भरीव कामगिरी केली आहे.
दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायत गटात घुलेवाडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळविला तर याच ग्रामपंचायतीने भूमी थिमॅटिक मध्ये उच्चतम कामगिरी नोंदवत दुसरा क्रमांक मिळविला आहे. या दोन्ही बक्षिसाची रक्कम सव्वा दोन कोटी रुपये आहे. याच गटात तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीने नाशिक विभागात राज्यस्तरावर उत्तेजनार्थ दहाव्या क्रमांक प्राप्त करत १५ लाखाचे बक्षीस मिळविले.
याशिवाय १० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात विभाग स्तरावर नाशिक विभागात धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतीने १५ वा क्रमांक मिळवत १५ लाखाचे, ५ हजार लोकसंख्येच्या आतील गटात खांडगाव ग्रामपंचायतने राज्यस्तरावर उत्तेजनार्थ सहावा क्रमांक मिळवत ५० लाखाचे बक्षीस मिळविले आहे. याच गटात नाशिक विभागात पेमगिरी व चिंचोली गुरव ग्रामपंचायतने अनुक्रमे २५ व ३३ वा क्रमांक मिळविला असून या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाख रुपये मिळणार आहे.
अडीच हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात नाशिक विभागात लोहारे ग्रामपंचायतीने ५५ वा क्रमांक मिळवत १५ लाखाचे बक्षीस मिळविले. दीड हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात तिगाव ग्रामपंचायतने राज्यस्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळविले.
अभियानात सहभाग नोंदवत संगमनेर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीनी सुमारे चार कोटी रुपयांची बक्षिसे मिळविली आहे. वसुंधरा संवर्धनात ग्रामपंचायतींनी आपला वाटा उचलत पर्यावरण पूरक कामाची चळवळ तयार केली आहे. हे यश सांघिक स्वरूपाचे आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन लाभले असून यापुढेही राज्यस्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवू. अभियानात सर्वाधिक बक्षिसे मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. – अनिल नागणे, गटविकास अधिकारी, संगमनेर.