सुसंस्कृत संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय?
शनिवार, ०५ ऑक्टोबर
संगमनेर – संगमनेर शहरात पडद्याआडचे कॅफे कल्चर वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग घडले आहेत. अशा बेकायदेशीर कॅफेमधून अल्पवयीन मुलींसह युवतींवर देखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असले तरी संगमनेरात असे उद्योग सुरूच असल्याचे उघड होत आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या या कारवाईचा माध्यमांना पोलिसांनी सुगावादेखील लागू दिला नाही.
शहराच्या कुठल्या आडवाटेला अथवा निर्जन ठिकाणी ही घटना घडली नसून शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीत गणेश नगर परिसरातील (अगदी महामार्गावर) घडली. ‘गोंधळ मिसळ’ या दुकानातील एका छुप्या कॅफेवर तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला आणि त्या ठिकाणी पडद्याआड, लाकडी प्लायवूडच्या कंपार्टमेंट आडोशाला चाळे करत असलेल्या जोडप्यांची एकच तारांबळ उडाली आणि चांगलीच पळापळ झाली.
पोलिसांनी या बनावट कॅफेत प्रवेश करताच तिथे अश्लील चाळे करणाऱ्या काही पोरा-पोरींनी तिथून धूम ठोकली. तर काही पोलिसांच्या हाती लागले. मात्र या संदर्भातील कारवाई आठवडा उलटला असला तरी देखील गुलदस्त्यात राहिली आहे. कॅफेमधील यापूर्वीचे प्रकार बघता आणि तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केलेल्या कारवाया लक्षात घेता या कारवाई बद्दल मात्र संशयाचे गडद मळभ तयार झाले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ यांच्यासह महिला पोलीस ताई शिंदे यांच्या पथकाने या ‘गोंधळ मिसळ’मध्ये छापा घातला.

पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणी असलेल्या जोडप्यांमधील काही मुले आणि मुली पळून जाण्यात यशस्वी झाले. गोंधळ मिसळच्या वरच्या मजल्यावर प्लायवूडचा वापर करून वेगवेगळे कंपार्टमेंट करण्यात आलेले आढळून आले. त्यात काही मुले व मुली या अश्लील चाळे करत असताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कडक शब्दात तंबी दिली. या कंपार्टमेंटला गडद रंगाचे पडदे लावण्यात आलेले होते. आतमध्ये बसण्यासाठी टेबल ठेवलेले दिसून आले. कॉफी शॉप असले तरी त्याचा परवाना दिसून आला नाही. शिवाय कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. पकडलेल्या प्रेमी युगुलांना पोलिसांच्या भाषेत कायदेशीर समज देण्यात आली. इ साक्ष ॲप्लीकेशनद्वारे व्हिडिओ व फोटो घेण्यात आले आहेत.
कॅफेवर काम करणाऱ्या दौलत बन्सी खाडे (वय ४२ वर्षे, रा. रंगारगल्ली, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानाच्या मूळ मालकाला बोलावण्यात येऊन चौकशी करण्यात आल्याची माहिती समजली असून पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली हे मात्र गुलदस्त्यात आहे.


