शनिवार, ०५ ऑक्टोबर
नाशिक – दररोजच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच या गुंडाराजची प्रचिती गुन्हे शाखेच्या अंमलदाराला आली आहे. आता चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास पकडत असताना त्यांनी अंमलदाराच्या पोटात चाकू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७ वर्ष, रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) असे हल्ला झालेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदाराचे नाव असून विकी संजय जाधव उर्फ गट्ट्या (रा. अवधूतवाडी, पंचवटी) असे हल्लेखोर संशयिताचे नाव आहे.
संशयित विकी जाधव हा हातात चाकू घेऊन शुक्रवारी रात्री अवधूत वाडी परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवत होता. रस्त्याने जाणाऱ्या अंमलदार सोनवणे यांनी हा प्रकार बघितल्यानंतर त्याला आडवत त्याच्या हातात चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधव याने त्यांना देखील न जुमानता प्रतिकार सुरू ठेवला.

अशातच सोनवणे त्याच्या हातातील चाकू काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना संशयित आरोपीने त्याच्या हातातील चाकू सोनवणे यांच्या पोटात खूपसला आणि पोलीस आमदार सोनवणे जखमी झाल्याचे लक्षात येताच आरोपी तेथून पळू लागला. त्यामुळे जखमी अवस्थेतही सोनवणे यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले.
त्यानंतर आरोपी जाधव याला पंचवटी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले असून पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आरोपी विरोधात दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. ए. पडोळकर पुढील तपास करत आहे.

