गुरुवार, २४ ऑक्टोंबर
अहिल्यानगर – एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार समोर आला.

गॅस पाईपलाईनच्या कामासाठी दोघांनी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याची तक्रार बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा (वय ३० हल्ली रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे आहे.
ठेकेदाराच्या तक्रारीवरून सोमनाथ कराळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नागापूर, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅस कंपनीचे ठेकेदार ५ ऑक्टोबरला एमआयडीसी कार्यालय बाहेर उभे असताना तेथे आलेल्या सोमनाथ कराळे याने ‘गॅस पाईपलाईनचे कॉन्ट्रक्टर तुम्हीच का? तुम्हालाएम आयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज करायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, तुम्हाला माझ्या परवानगीशिवाय कामकाज चालू करता येणार नाही’. 
तुम्हाला पैसे का द्यायचे अशी ठेकेदाराने आरोपीला विचारणा केल्यानंतर त्याने ठेकेदाराला शिवीगाळ करून ‘मी या गावचा दादा आहे, मला पैसे दिले नाही, तर मी तुझे कामकाज चालू देणार नाही. तसेच तुझ्या कामगारांना मारहाण करून त्यांना पळवून लावेल, असा दम देत तिथून निघून गेला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.

