शुक्रवार, २५ ऑक्टोंबर
मुलाच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हामध्ये त्याला अटक न करण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या मदतीने २५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्ती विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली. 
पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करू नये तसेच त्याला मदत करू यासाठी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात संबंधित व्यक्तीने एसीबीकडे पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाच मागणी केल्याची तक्रार केली.
एसीबीने तक्रारीची टाकळी हाजी पोलीस चौकीत पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे याने तक्रारदाराला सुभाष मुंजाळ या खासगी व्यक्तीशी बोलण्यास सांगितले. खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ याने तक्रारदारांकडे साहेबांना देण्यासाठी म्हणून १० हजार रुपये लाच मागितली. त्याला माणिक मांडगे याने दुजोरा देऊन १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नसली तरी लाचेची मागणी झाली असल्याने गुरुवारी दोघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.

