बुधवार, ०६ नोव्हेंबर
संगमनेर – अज्ञात चोरट्यांनी ब्युटी पार्लर आणि बंद असलेला बंगला फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी चोरून नेले असल्याचा प्रकार समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील जाणता राजा मैदान परिसरात ब्युटी पार्लर अज्ञात चोरट्यांनी फोडत १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. दुसऱ्या घटनेत घुलेवाडी हद्दीतील मालपाणी नगरमध्ये बंगला फोडण्यात आला. यातही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे. 
निकिता अजित साळवे यांचे जाणता राजा मैदान परिसरात मेहेर शाळेजवळ कांसा ब्युटी सलून नावाचे पार्लर आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे त्या पार्लर बंद करून घरी गेल्या होत्या. रविवारी दुपारी पार्लर उघडण्यासाठी त्या आल्या असत्या त्यांना पार्लरच्या दुकानाचे कुलूप तुटून खाली पडलेले तसेच कडे लावलेले दिसली.
त्यामुळे त्यांनी दुकान उघडून बघितले असता दुकानातील कपाट फोडून कपाटामधील लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ज्वेलरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच पार्लरमध्ये अन्य दोन खोल्यांमध्येही सामानाची उचकापाचं करून सामान अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले होते. या संदर्भात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
दुसऱ्या घटनेत मालपाणी नगर येथे ज्ञानदेव किसन खेमनर यांचा बंगला आहे दोन मजली बंगल्यात ध्वनीत विठ्ठल शिंदे हे देखील राहण्यास आहे. दोघेही दीपावली सणानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेले असता बंद असलेल्या या दरवाजाचे कुलूप तोडत अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. या संदर्भात देखील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. 
चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद… दीपावली सणानिमित्त गावाकडे गेलेल्या खेमनर यांच्या बंगल्यातील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून दुचाकीहून आलेल्या चोरट्यांनी ही चोरी केली आहे तसेच चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे. या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

