विधानसभा निवडणूक स्पेशल
अनंत पांगारकर
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन ठेपला असतानाच आता संगमनेर मतदार संघात उभ्या असलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कोट्यावधीच्या निधीबाबत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यावधीच्या पेड न्यूजचे प्रकरण समोर आले असतानाच आता विविध उमेदवारांना मिळालेल्या निधीच्या चर्चा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक आयोगाने आर्थिक संवेदनशील जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पथके मतदार संघात कार्यरत असली तरी अद्याप शहरात समोर आलेले हवालाचे एक प्रकरण वगळता या भरारी पथकाच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवार मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर काढत असल्याच्या चर्चा सातत्याने झडत असतात. थेट काही हजारांमध्ये मतदाराला मतदानाची किंमत मोजली जाते, यासाठी उमेदवारांच्या यंत्रणा कार्यरत असतात. निवडणुकीनंतर या आर्थिक उलाढालीच्या चर्चा कट्ट्या-कट्ट्यांवर रंगलेल्या दिसतात.
यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पेड न्यूज चर्चेचा विषय ठरल्या आहेत. तसेच शिंदे यांच्याशी संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे मोठ्या प्रमाणातील रकमा देखील आयोगाने पकडल्याने या चर्चांना दुजोरा मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आर्थिक उलाढालीची चिन्ह निर्माण झाली आहे.
संगमनेरमध्ये देखील अपक्षांचा अपवाद वगळता राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. पक्षाकडून उमेदवाराला निवडणुकीसाठी मोठा निवडणूक निधी मिळत असतो. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये देखील उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पक्षीय निधी मिळाल्याच्या आणि हा निधी काही कोटींच्या घरात असल्याच्या चर्चा सुरू आहे.
यामुळे निवडणुकीतील पैशाच्या राजकारणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा वेग पकडला आहे. त्यातच महायुतीच्या उमेदवाराच्या सांगता प्रचार सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री संगमनेरात येत असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला देखील नेमके किती रुपयांचे पॅकेज आले आणि हे पॅकेज कोणाकडे सोपविले गेले यासंदर्भात चर्चा सुरू आहे. स्पर्धेत आलेल्या प्रमुख सर्वच उमेदवारांकडून मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैशाचा चुराडा सुरू झाला असल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलू लागले आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या मतदारसंघात झालेल्या मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार लक्षात घेत हा मतदार संघ प्रशासनाकडून आर्थिक संवेदनशील जाहीर करण्यात आल्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होणार असल्याचे संकेत उमेदवारांना मिळालेल्या कोट्यावधी रुपयांच्या पॅकेजच्या चर्चेच्या माध्यमातून मिळत आहे.
आचारसंहिता भरारी पथके नेमके करतात काय? पॅकेजचे कोट्यावधी रुपये मतदार संघात पोहोचले कसे…
आर्थिक संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात निवडणूक आयोगाकडून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी करून ही पथके कार्यरत आहे. मात्र या पथकांच्या हाती अद्यापही काही लागू शकले नाही. त्यामुळे या पथकांच्या कार्यशैलींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पथकांना चुकवून पॅकेजच्या या रकमा मतदारसंघात सुखरूपपणे पोहोचल्या की काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

