शुक्रवार, २९ नोव्हेंबर – संगमनेर
देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २००२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सातत्याने उत्कृष्ट कामगिरी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्यावतीने स्पेशल कॅटेगिरीमधून सातत्यपूर्ण कामगिरीचा नॅशनल को जनरेशन पुरस्कार २०२४ कारखान्यासाठी जाहीर झाला आहे.
उच्चांकी भाव – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. कारखान्यावर सभासद ऊस उत्पादक व कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास असून यावर्षी सुद्धा दहा लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. 
सांघिक कामाचे यश – यापूर्वीही या पुरस्काराने थोरात कारखान्याचा दिल्ली येथे सन्मान झाला आहे. हा पुरस्कार सांघीक कामाचे यश असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे.
यांनी केले अभिनंदन – कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, दुर्गाताई तांबे आदींनी अभिनंदन केले आहे.

