शनिवार ३० नोव्हेंबर – संगमनेर
संगमनेरमधून महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. उमेदवाराचे अभिनंदन करणारे फलक शहरासह तालुक्यात सर्वत्र लागले असून या फलकावर महायुतीचे प्रमुख नेते असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने आठवले गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कैलास कासार, आशिष शेळके यांचा सवाल – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ निवडून आले आहे. महायुतीचा धर्म पाळत आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले, त्यांच्या विजयात आमचाही महत्त्वाचा वाटा आहे. मात्र शहर आणि तालुक्यात लागणाऱ्या कोणत्याही बॅनरवर आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांचे छायाचित्र नसल्याने महायुतीला आठवले यांचा विसर पडला का असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कैलास कासार आणि तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीच्या प्रचारात आरपीआयचा मोठा वाटा – संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला. खताळ यांच्या विजयासाठी महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. या विजयामध्ये आरपीआय कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.

आठवलेंचे छायाचित्र प्रत्येक बॅनरवर हवे – निवडणुकीनंतर शहरात खताळ यांच्या अभिनंदन आचे सर्वत्र बॅनर लागले आहे. मात्र या बॅनरवर महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख नेते असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे छायाचित्र वापरले गेले नाही. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आठवले यांचा विसर पडला का? आठवले यांचे छायाचित्र या फलकावर का वापरले गेले नाही. असा सवाल करत इतर नेत्यांच्या बरोबरीने रामदास आठवले यांचे छायाचित्र प्रत्येक फलकावर वापरले गेले पाहिजे असे कासार व शेळके यांनी म्हटले आहे.

