रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई
राज्यभरात सातत्याने महागाईत वाढ होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेल्या योजनांमध्ये आता बदल सुरू केला आहे. रविवारी झालेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीपाठोपाठ आता लालपरीचा प्रवास देखील महागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, फळे, साबण, खाद्य तेल अशा कित्येक गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसणार आहे. 
पंधरा टक्के वाढ होणार – समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्यांचे लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसच्या तिकिटामध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नसल्याने विधानसभा निवडणूक संपतात एसटी महामंडळाकडून १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. यामुळे लालपरीच्या तिकीट दरात आता जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

याआधी कधी झाली होती वाढ – दरम्यान, याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीट दरवाढ झाली होती. त्यानंतर आता तिकीट दरवाढ होणार का? दरम्यान मधल्या काळात राज्य सरकारने महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची महिला सन्मान योजना आणली होती. आता नव्याने एसटीने सरकारला दरवाढीचा प्रस्ताव दिल्याने सरकार या दरवाढीला मंजुरी देते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

