सोमवार ०२ डिसेंबर – मुंबई
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे आणि शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करणारे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आहे. हे दोन्ही माजी आमदार पवार यांच्या पक्षात प्रवेश करत हाती घड्याळ बांधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दादांचा काकांना पुन्हा धक्का – शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंधित असलेले हे दोन्ही माजी आमदार विधानसभा निवडणूक संपतात सरकार स्थापनेपूर्वी अजित पवारांसोबत जाणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे समोर येत आहे. डॉक्टर अपूर्व हिरे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता.
हिरे ठाकरेंकडे गेले तर जगताप यांनी बंडखोरी केली – शिवसेना ठाकरे गटात जाण्यापूर्वी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर राहुल जगताप यांनी श्रीगोंदा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र ही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुटली होती. या जागेवर शिवसेनेकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जगताप यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दरम्यान त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले होते.
हिरे यांनी घेतली अजितदादांची भेट – दरम्यान माजी आमदार डॉ. हिरे यांचा अजित पवार यांच्याशी चांगला संपर्क असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घर वापसीचा निर्णय घेतला आहे.
जगतापांच्या पक्षप्रवेश चर्चेलाही उधान – दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्याही पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यापूर्वीच हे दोन्ही माजी आमदार अजित पवारांसोबत गेल्यास पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.