गुरुवार, ०५ डिसेंबर – संगमनेर
शहरातून गायब झालेल्या दुचाकी चोराबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी दुचाकी चोराचा शोध घेण्यासाठी बीड गाठले. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन संगमनेरमध्ये आणले आणि पोलीस चौकशीमध्ये त्याने एक एक करत चोरलेल्या तीन बुलेटसह पाच दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
दागिने दुचाकी चोऱ्या – दिवसेंदिवस संगमनेरमध्ये वाढत असलेल्या दागिने आणि दुचाकीचोरांना पकडण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. दागिने आणि दुचाकी चोरांचा शक्यतो पोलिसांना तपास लागत नसतानाच संगमनेरमधून समाधानकारक बातमी समोर आली आहे. चोरीस गेलेल्या पाच दुचाकींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीला बीड जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात संगमनेर पोलिसांना यश आले असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे.
हा आहे आरोपी – पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर अहिल्यानगर, बीड, धाराशिव, आणि सोलापूर जिल्ह्यातून या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. सौरभ शिवाजी वारे (वय २०, रा. आष्टी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे.
पोलीस पोहोचले आरोपीपर्यंत – मार्च महिन्यात शहर पोलिस ठाण्यात वाहने चोरीला गेल्याच्या संदर्भाने गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना वाहने चोरणारा आष्टी (जि. बीड) येथील असल्याची माहिती मिळाली होती. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बीड येथे आणि त्यानंतर सौरभ वारे याच्यापर्यंत पोहोचत त्याला ताब्यात घेण्यात आले.
आणखी दुचाकीचा शोध लागण्याची शक्यता – पोलिसांनी आतापर्यंत पाच दुचाकी आरोपीच्या ताब्यातून हस्तगत केल्या असून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्याच्या फरार साथीदाराचा देखील पोलिसांनी शोध सुरू केला आहे. यामुळे दुचाकी चोरीची एखादी टोळी देखील उजेडात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरोपींनी आतापर्यंत शहरातून किती दुचाकी लांबविल्या याचा पोलीस तपास करत आहे.



