रविवार, ०८ डिसेंबर – अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असलेले मिठुभाई शेख यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी आढळून आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शेख गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबरला पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास देखील सुरू होता.
शनिवारी त्यांचा मृतदेह खेर्डा फाटा येथील एका शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस कर्मचारी अभयसिंग लबडे, राम सोनवणे आदींनी माहिती मिळताच धाव घेतली होती. नातेवाईकांच्या मदतीने शेख यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असून घटनास्थळालगतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शनिवारी संध्याकाळी शेख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून व्हीसेरा तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आगरकर यांनी दिली असून त्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेख गेल्या ३० वर्षापासून पाथर्डी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते काही काळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते.

