गुरुवार १२ डिसेंबर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या सातत्याने सुरू आहे. शहरातील मालपाणी हेल्थ क्लबच्या रिसॉर्टमधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
या संदर्भात रिसॉर्टचे कर्मचारी सचिन सदाशिव गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडे यांच्या तिजोरीत सहा लाख रुपयांची रोकड जमा होती. तिजोरीतील ही रोख रक्कम चोरी गेली आहे. याप्रकरणी तिघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांनी ही रोकड चोरल्याचा आरोप आहे.
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी विशाल चंद्रकांत शिंदे, सचिन अशोक काळे व प्रथमेश संजय मिसाळ या तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १०२६/ २०२४ बी. एन. एस. कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे करत आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी तपासाकामी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.


