शनिवार, २८ डिसेंबर
संगमनेर – हल्ली संगमनेरमध्ये दुचाकी, दागिने चोऱ्या वाढल्या असतानाच आता अज्ञात चोरट्याने चक्क दारूचे दुकान फोडून पाऊण लाखाची दारू लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. नासिक-पुणे मार्गावर सातत्याने असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटलेल्या संगमनेर पोलिसांना दारूचे दुकान फोडत गुन्हेगारांनी नवे आव्हान दिले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ७१ हजार ६६० रुपयांची विविध कंपनीची दारू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या अरगडे गल्लीतील डिद्दी यांच्या मालकीचे हॉटेल वाईन स्पॉट हे हॉटेल बुधवारी (२५ डिसेंबर) रात्री नेहमीप्रमाणे बंद करून हॉटेलचे व्यवस्थापक घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी हॉटेल उघडण्यासाठी आले असता हॉटेलचे शटर मध्यभागी उचकटलेले होते.
व्यवस्थापक आणि वेटर यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता हॉटेलचा गल्ला फोडलेला दिसला व रॅकला लावलेल्या दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या नाही. अज्ञात चोरट्याने चोरून नेलेल्या दारू मध्ये ग्लेनवा कंपनी, ऑस्मिथ गोल्ड कंपनी, टीचर कंपनी वेट कंपनी ब्लॅक डॉग कंपनी जॉनी वॉकर रेड लेबल कंपनीच्या दारूसह सीसीटीव्ही व पंधरा हजार रुपयांच्या रोकड रकमेचा समावेश आहे.
शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दारूच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अशोक पारधी करत आहे.
दारूचे दुकान फोडून पाऊण लाखाची दारू चोरट्याने केली लंपास, शहरातील घटना
अज्ञात चोरट्याने चोरून नेलेल्या दारू मध्ये ग्लेनवा कंपनी, ऑस्मिथ गोल्ड कंपनी, टीचर कंपनी, ब्लॅक डॉग कंपनी, जॉनी वॉकर, रेड लेबल कंपनीच्या दारूचा समावेश

