
गुरुवार, ०२ जानेवारी
संगमनेर – सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र दुधासाठीचे अनुदान ऑक्टोंबर महिन्यापासून मिळाले नसून सरकारने हे अनुदान तातडीने वितरित करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची तसेच डिसेंबर नंतरही अनुदान योजना पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केली आहे.
देशमुख म्हणाले, माहे जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शासनाने प्रति लिटर पाच रुपये तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यासाठी प्रति लिटर सात रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर पर्यंतचे अनुदान प्राप्त झाले असून ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे अनुदान दूध उत्पादकांना अद्याप मिळालेले नाही.
सद्यस्थितीत दूध भुकटी व बटरचे दर स्थिर आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दुधाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच चाऱ्याचे व पशुखाद्याचे दर वाढलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय देखील अडचणीत सापडला असून शासनाने दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. जानेवारी महिना उजाडला तरीदेखील डिसेंबर महिन्यापर्यंतचे अनुदान देण्यासंदर्भात शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून शासनाने कोणताही विलंब न लावता तात्काळ अनुदानासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे.


