संगमनेर – विधानसभा निवडणुकीत संगमनेरात सत्ता बदल झाल्यानंतर येथील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. लोकविकास आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा राहत असून होऊ घातलेल्या नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविली जाणार असून या संदर्भातील कृती कार्यक्रमाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याचे रजत अवसक व दत्ता ढगे यांनी दिली.
स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानमध्ये लोकशाही समाजवादी विचारांच्या नागरिकांची व्यापक बैठक पार पडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानज्योती फातिमामाई शेख यांना अभिवादन करून बैठकीची सुरुवात झाली होती.
बैठकीत भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या लोकशाही समाजवादी विचारांचे राजकीय सामाजिक व सांस्कृतिक काम उभे करण्याचा निर्धार करण्यात आला तसेच लोकविकास आघाडीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करून या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याचे ठरले आहे.
शेतीतील प्रश्न गंभीर आहेत. रोजगार नसल्याने तरुणांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रचंड महाग झालेल शिक्षण, परवडत नसलेला आरोग्याचा खर्च या गंभीर समस्या आहेत. त्यामुळे लोकविकासच्या माध्यमातून शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण, महिला व युवकांचा विकास या सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्या मारण्याचा प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे ठरले.
सर्वसामान्य माणसाचे जगण्या-मरण्याचे प्रश्न विसरलेल्या दोन्ही प्रस्थापित घराण्यांच्या गुलामीतून तालुक्याला बाहेर काढण्याचा आणि लोकांच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नावर राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रस्थापित त्यांची सर्व धोरणे स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठीचीच आहेत.
दोघेही महसूल मंत्री राहिले परंतु दोघांनीही संगमनेर जिल्हा होऊ दिला नाही. स्थानिक पातळीवर विकास झाला तर यांची निवडणुकीची आर्थिक गणिते बिघडतील म्हणून यांनी भाषा विकासाची केली मात्र कृती त्या विरोधातली केली. सर्वसामान्यांनी उभ्या केलेल्या संस्थांचे हे मालक होऊन बसले.
साथी भास्करराव दुर्वे, कॉ. दत्ता देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे राजकारण उभे करण्याचा ठाम निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. लवकरच पत्रकार परिषदेद्वारे लोकविकास आघाडीच्या पुढील कृती कार्यक्रमाची घोषणा करण्यात येणार असल्याचे दत्ता ढगे आणि रजत अवसक यांनी सांगितले.
यांची उपस्थिती – या बैठकीसाठी राजाभाऊ अवसक, ॲड. गोपीनाथ घुले, ॲड. संग्राम जोंधळे, अजिजभाई व्होहरा, विजया पाडेकर, अर्जुन वाळे, प्रशांत पानसरे, श्रीकांत रहाणे, प्रमोद मोदड, रवींद्र पवार, मंगेश गुंजाळ, विशाल वैराळ, दत्तात्रय कांडेकर, मानव अहिरे, बापू खेमनर, करण कांडेकर, रवींद्र आखाडे, सिध्दार्थ दारोळे आदी उपस्थित होते.