दिल्ली – रस्ते अपघातातील जखमींना दिलासा देणारी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांनी देशभरात कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केले असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जखमींवर दीड लाखापर्यंतचा खर्च केला जाणार आहे. योजनेअंतर्गत सात दिवसांपर्यंत सरकार या उपचाराचा खर्च करेल.
मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरू केली जाणार – देशभरातील सर्व राज्यांमधील वाहतूक मंत्र्यांची दिल्लीत भारत मंडपम येथे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत गडकरी देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी अपघातग्रस्तांना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्यासाठी सुरू असलेल्या प्रायोगिक उपक्रमाचा मार्च २०२५ पर्यंत विस्तार केला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
ही असेल अट – या योजनेचा लाभ घेण्यासाठी गडकरी यांनी एक महत्त्वाचे अट घातली आहे. योजना कोणत्याही श्रेणीतील रस्त्यावर मोटार वाहनांच्या वापरामुळे होणाऱ्या सर्व लागू होणार असून या अपघाताची माहिती जर चोवीस तासात पोलिसांना देण्यात आली तरच सरकार या उपचाराचा खर्च उचलणार आहे. या उपचाराचा लाभ घेण्यासाठी अपघाताची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे.
हिट अँड रन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखाची मदत – याचबरोबर हिट अँड रन मध्ये मृत्यू झालेल्या यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, असे देखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नवीन बस, ट्रकसाठी ऑडिओ वार्निंग सिस्टम – नवीन बस आणि ट्रकसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली लागू करणे बंधनकारक केले जाणार असून ज्यामध्ये वाहन चालकांना वाहन चालवताना झोपेतून सावध करण्यासाठी ऑडिओ वार्निंग सिस्टीमचा समावेश असेल. व्यावसायिक वाहनांसाठी वाहन चालकांना दिवसातून आठ तासापेक्षा अधिक वेळ वाहन चालवता येणार नाही. यासाठी मंत्रालय आधार आधारित किंवा अन्य तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचाही सरकार विचार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.
पाच हजाराचे बक्षीस – अपघातग्रस्तांना वाचवणाऱ्या चांगल्या व्यक्तींना सध्या पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
रुग्णालयांमध्ये एअर ॲम्बुलन्सची सोय – महामार्गावर रस्त्याच्या कडेला हेलिपॅड तयार करून एअर ॲम्बुलन्सचे कामकाज सुलभ व्हावे. काही रुग्णालयांमध्ये एअर ॲम्बुलन्सची सोय व्हावी, यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.
कुशल वाहनचालकांची कमतरता – भारताला कुशल वाहन चालकांची मोठी कमतरता आहे. मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात २२ लाख कुशल चालकांची कमतरता असून या कमतरतेमुळे ७५% वाहतूक व्यवसायावर परिणाम झाला आहे. प्रत्येक १०० ट्रक मागे केवळ ७५ चालक उपलब्ध होते. अनधिकृत वाहन चालकांनी चालविलेल्या वाहनांमुळे एकूण तीस हजार मृत्यू झाले आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीतून मंत्रालय १२५० नवीन ड्रायव्हिंग लर्निंग सेंटर सुरू करणार आहे.

