शिर्डी : शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते, त्याला २० फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी द्रोह केला होता. २०१९ ला बाळासाहेबांची विचारधारा सोडली, त्यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
शिर्डी येथे रविवारी भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी आक्रमक भाषण करीत विरोधकांना लक्ष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा दिला.
विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगानेच आज शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवार जोरदार हल्ला चढवला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेपेक्षाही मोठा विजय प्राप्त करायचा आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
शहा म्हणाले, आज महाराष्ट्रातील महाविजयानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत. तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठे कार्य केले आहे. तुमच्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. आपले मित्रपक्ष खरी शिवसेना आणि राष्ट्रवादीला देखील मोठे यश मिळाले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते, त्याला २० फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले. उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली. २०२४ पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले.
आपल्या विजयाच्या मागे आपली एकजूट होती. ४०लाख सदस्य बनले आहेत अजून दीड करोड करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो एकही बूथ असे नसावे की जिथे अडीचशेपेक्षा कमी सदस्य असतील असा पक्ष आपल्याला बनवायचा आहे. येणाऱ्या दीड महिन्यात असे जोमाने काम करा की प्रत्येक बूथवर २५० पेक्षा जास्त सदस्य जोडले जातील. सर्व महानगरपालिका, नगरपालिका स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत, यात विरोधकांना बसायला सुद्धा जागा मिळाली नाही पाहिजे याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. पंचायतमध्ये सुद्धा भाजप, तहसीलमध्ये सुद्धा भाजप, महानगरपालिकेतही भाजप, महाराष्ट्रातही भाजप आणि देशातही भाजप. पंचायतपासून संसदेपर्यंत विजयाचे सूत्रधार बनण्यासाठी आज तुम्हाला बोलावले आहे.
शरद पवार एवढे वर्षे कृषिमंत्री राहिले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, देशाचे मंत्री राहिले, मात्र ते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला मुक्त करू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवण्याचे काम करत असून, हे काम केवळ भाजपच करू शकते.