संगमनेर – अलिबाग (जि. रायगड) येथील साईभक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी लावत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी (ता.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अलिबाग येथील साईभक्त प्रवीण वसंत नाईक, अभय रवींद्र ठाकूर, गणेश दत्तात्रय मेस्त्री, ऋषिकेश पडवळ, जयेश जयराज कोंडे, राजेंद्र ठाकूर हे सर्व साईभक्त वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कौठे कमळेश्वर गावच्या पुढे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते आले असता याचवेळी कारमधून आलेल्या चार अज्ञात लुटारूंनी त्यांच्या वाहनाला कार आडवी लावली.
यानंतर मारहाण करुन त्यांच्याकडील ३३ हजार रुपये रोख रक्कम, लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, चार हजार रुपये किंमतीची साडेपाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४५ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची साखळी असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे.
याप्रकरणी प्रवीण नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चार लुटारूंवर भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए. के. मोकळ हे करत आहेत.



