Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्रच तो, इथे सामंतांचाही उदय होऊ शकतो…
विश्लेषण

महाराष्ट्रच तो, इथे सामंतांचाही उदय होऊ शकतो…

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2025Updated:26/01/2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

वाचकहो, मथळा पाहून तुम्हाला कळलं असेल आम्हाला काय म्हणायचेय ते. हा महाराष्ट्र आहे इथे कोणीही कसाई होऊ शकतो. राजकारणात कोणाचीही कत्तल करायला इथे फार मेहनत घ्यावी लागत नाही. जिथे शरद पवारांची जागा अजित पवार आणि उध्दव ठाकरेंची जागा एकनाथ शिंदे घेऊ शकतात, त्या राज्यात काहीही घडू शकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विमान दाहोसला उतरता उतरता महाराष्ट्रभर सामंतांच्या उदयाची जोरदार चर्चा सुरू झाली. 

सामंत यांच्याविषयी राजकीय गणिताच्या पायर्‍या रचल्या जाऊ लागल्या. त्या अगदीच वायफळ होत्या असं कोणी म्हणेल तर त्याची राजकारणातल्या वेड्यात गणती होईल. ही ती वेळ नाही, असंच कोणी सांगेल. अपेक्षित नसताना ५७ जागा मिळवणं, अपेक्षित नसताना महत्वाची मंत्रिपदं मिळणं, पुढे दोन अपवाद वगळता शक्य नसलेली पालकमंत्री पदं मिळणं, या सार्‍या गोष्टी प्राप्त झाल्यावर एका गटाला सोडून दुसरीकडे जाण्याचं धारिष्ठ्य कोण कशाला करेल, असं काहींना वाटू शकतं. भरलं ताट असं कोणी लोटून देतं का? खरंय, पंचपक्वान्नाने भरलेलं ताट दूर लोटायला काळीज दगडाचं लागतं. पण तरीही महाराष्ट्रात हे घडू शकतं… होय हे घडू शकतं… 

एकनाथ शिंदे यांच्यापुढेही असंच भरलं ताट होतं. त्यांना शिवसेनेने काही कमी दिलं नव्हतं. राजकारणात आल्यापासून त्यांच्या तोंडात चांदीचा चमचाच असायचा. तरीही त्यांनी एका रात्रीत गोहाटी गाठलंच ना? रातोरात त्यांनी उध्दव ठाकरेंना उघड पाडलंच ना? अजित पवारांनी अपेक्षा नसताना आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी शरद पवारांना रस्त्यावर आणलंच ना? हा महाराष्ट्र आहे, इथे काहीही घडू शकतं. पुरोगामी आणि संस्कृती हा महाराष्ट्राचा गूण केवळ बोलण्यापुरता शिल्लक राहिलाय. होय, इथे काहीही घडू शकतं.

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणण्याच्या इराद्याने स्वीझर्लंड इथल्या दाहोसला पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्या इराद्यांची चर्चा जोरकसपणे सुरू झाली. मात्र ती नवी नव्हती. याआधीही हे दोघं एकमेकांचे चांगले दोस्त होते. आता ते अधिक जवळ आले असल्यास नवल नाही. जे पेरावं ते उगवत असतं. सध्या राजकीय पेरणी सुरू आहे. नियतीचा हा खेळ होय. सत्तेची सारी उब देऊनही उध्दव ठाकरे यांना रात्रीत रस्त्यावर आणणार्‍यांची नियती फार तर वाट पाहील. पण ती काहीच करणार नाही, असं नाही. कारण हा अधुनिक महाराष्ट्र आहे. इथे कोणीही कसाई बनू शकतो.

महाराष्ट्रभर याची चर्चा सुरू झाल्यावर नेहमीप्रमाणे सामंत यांनी थयथयाट केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी कितीदा प्रयत्न केले, असं काहीबाही सामंत बोलून गेले. वडेट्टीवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येण्यासाठी कितीदा त्यांना भेटले असं एकवेळ सामंत यांनी विचारलं असतं तर विश्‍वासाला जागा होती. मात्र वडेट्टीवार भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्नाला लागले होते, हे सामंत यांना कोणी सांगितलं? जे काम फडणवीसांनी करायचं ते सामंत का करायला धजले? सामंतांविषयीच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात असल्याची वाच्यता खरी तर फडणवीसांनी करायला हवी होती. त्यात त्यांनी वडेट्टीवार भाजपवासी बनण्यासाठी कसे पायघड्या घालतात ते सांगितलं असतं तर पटण्याजोगे होतं. मात्र त्याऐवजी सामंतांच्या तोंडी हे वक्तवून सामंतांच्या हेतूला फोडणी देण्याचा प्रयत्न केला. एका दगडात दोन पक्षी मारले. सामंतांच्या रुपाने शिंदेंपुढे नवं आव्हान उभं केलं की नाराजीला दूर करणं शक्य आहे, असं गणित यामागे होतं.

राज्यात सत्ता असताना १८ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत उदय सामंत नव्हते. सगळे गोहाटीला पोहोचले असल्याची खात्री झाल्यावर सामंतही रवाना झाले, हे अनेकांना लक्षातही नसेल. संधी पाहून त्यांनी गोहाटी गाठली होती. आता संधी असताना बाहेर का राहायचं, असं त्यांना वाटल्यास नवल नाही. संधीसाधू असेच असतात. त्यांना काफीर म्हटलं जातं. कोणालाही फसवायला त्यांना काहीही वाटत नाही. आपल्याला एकनाथ शिंदेंची जागा घेणं किती शक्य आहे, याचीही चाचपणी त्यांनी केली असं वाटत नाही. शिंदे यांनी शिवसेनेची मालकी सांगताना त्यांच्यामागे भाजपची राज्यातील सारी ताकद होती. शिवाय मोदी आणि शहा यांचे आशीर्वाद होतेच. महाविकास आघाडी फोडता येत असेल तर या दोघांना ते हवंच होतं. कसायाला आणखी काय हवं असतं. बकरा असा चालून आल्यावर त्याला चांगलं खाद्य हे न मागता मिळत असतं.

शिंदेंना ते मुख्यमंत्रीपदाने दिलं. सामंतांना ते मिळेल, अशी काहीही परिस्थिती नाही. सामंत आले काय आणि गेले काय फडणवीसांच्या सत्तेवर त्याचा जरा मात्र परिणाम होण्याचा प्रश्‍न नाही. केवळ शिंदेंवर जरब बसवता आली तरी ती पुरेशी. अविश्‍वासपात्र माणसांकडून अशी कामं करून घेणं सहज शक्य असतं. अशी माणसं घरचा आणि दारचाही विचार करू शकत नाहीत. ज्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा विचार केला नाही, ते एकनाथ शिंदेंबाबत उदारपणा घेतील असं मानणं वेडेपणाचंच होय. पुढे फडणवीस यांना ते तोंडघडशी पाडणारच नाहीत, अशी कोणीही खात्री देऊ शकणार नाही. लालसेपोटी माणूस काहीही करू शकतो, हे याआधी जे दिसलं ते आता दिसतं इतकंच. सत्ता आणि त्यातून मिळणार्‍या मलिद्याचा प्रश्‍न असतो. तो जसजसा वाढत जातो तशी रुपं बदलावी लागतात.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षात उदय झालेले सामंत यांचा त्या पक्षाने पुनर्वास केला. जमिनीची सुपिकता कमी झाली असं पाहून त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. राष्ट्रवादीत सहभाग घेताना त्यांनी आमदारकी मिळवली. तेव्हा भाजपचा फारसा बोलबाला राज्यात नव्हता. या पक्षाबरोबरील शिवसेनेची ताकद निश्‍चितच मोठी होती. हे ताडून त्यांनी हाताला भगवा बांधला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी स्वत:चा जम बसवला. यातून शिवसेनेपेक्षा स्वत:चं महत्व वाढवलं. तेव्हा उध्दव ठाकरे अंधारात होते. म्हाडाचे प्रमुखपासून सुरू झालेला हा प्रवास कधीच थांबला नाही. नगरविकास राज्यमंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षण ते उद्योग अशी चढती रेषा कायम राहिली. प्रचंड बहुमताची सत्ता राज्यात प्राप्त होऊनही एकनाथ शिंदे नाराज होते. यामुळे मुख्यमंत्री ठरायला दहा दिवसांचा अवधी गेला. पुढे मंत्रीपदांच्या वाटमारीत आठवडा गेला. आपला नेता सत्तेत सहभाग घेत नाही, असं पाहून इतर सहकारी मुख्यमंत्रीपदाच्या बाजूने ठाम उभे असताना सामंत मात्र वेगळ्याच वाटेवर होते.

सरकारमध्ये येण्यासाठी आम्ही शिंदेंवर दबाव आणू असं जेव्हा सामंत बोलून गेले तेव्हाच सामंत यांच्या अंर्तमनातील हेतू शिंदेंना कळून चुकला. अधिक ताणून घेतलं असतं तर लालसेने आतूर झालेले २० जण शिंदेंना सोडून फडणवीसमय कधी झाले असते ते सांगता येत नाही. यामुळे काहीही हाती न लागता गुमान उपमुख्यमंत्री पदावर तहान भागवावी लागली.

सामंत ही भाजपसाठी चालून आलेली संधी आहे. यानिमित्त भरलेलं ताट सामंत यांच्यापुढे आणून ठेवलं तर एकनाथ शिंदेंना तो इशाराच ठरेल. प्रत्येक गोष्टीत सातारा गाठणार्‍या शिंदेंना ताळ्यावर आणण्याचा तो प्रभावी मार्ग होय, हे फडणवीस जाणून आहेत. असं झालं तरच सत्ता निर्धोकपणे चालवणं शक्य आहे. सारा खेळ सत्तेचा आहे. इथे कोणीही कोणासाठी अमरपट्टा घेऊन आलेला नाही. संधी मिळाली की उड्या घेणं ही महाराष्ट्राची नवी संस्कृती आहे.

उदयरावांचा पार्श्‍वइतिहास लक्षात घेतला तर ते कोणाच्याही मांडीवर सहज जाऊन बसू शकतात. एकच शिंदेंचे कितीजण त्यांच्या सोबत जातील हे आजतरी ते स्वत: सांगू शकणार नाहीत. सहकार्‍यांना सांभाळण्यासाठी शिंदे यांनी जे केलं ते सामंत करतील यावर कोणाचा भरवसा नाही. याघडीला केवळ भीतीची चाहूल दिली तरी पुरेशी. अशा वातावरणाची निर्मिती सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी तितकी अनैतिकता जोपसल्याने महाराष्ट्रात काहीही घडू शकतं, हे मात्र सुर्यप्रकाशा इतकं सत्य.

(लेखकाशी संपर्क – ८१६९१३५२५३)

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 375
उदय सामंत देवेंद्र फडणवीस प्रवीण पुरो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

रविवार विशेष लेख ज्ञानेशाच्या नावानं भाजपचं चांगभलं!

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar09/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला रासेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची…

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.