प्रत्येकात दडलेला सुप्त राजहंस ओळखण्यासाठी मेधा महोत्सव – माजी आमदार डॉ. तांबे
या महोत्सवाच्या माध्यमातून येथे येणारे मान्यवर तुम्हाला स्फूर्ती, प्रेरणा देतील. तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतील. अशी चांगली व्यक्तिमत्व तुमच्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून येथे येतील.


संगमनेर दि. २ फेब्रुवारी –
संगमनेरमध्ये रविवारी दोन दिवस चालणाऱ्या आणि तरुण-तरुणींसाठी आकर्षण ठरलेल्या मेधा महोत्सव २०२५ ला प्रारंभ झाला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रख्यात उद्योजक व लेखक शरद तांदळे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले, अनेक दिवस ज्या उत्सव, महोत्सवाची प्रतीक्षा केली जाते असा मेधा महोत्सव २०२५ आज सुरू होत आहे. तरुणांसाठी आयोजित केला जाणारा हा महोत्सव आहे. हे वय अत्यंत डायनामिक असं असतं. आयुष्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. सर्वार्थाने उत्साहाने ओतप्रोत भरलेला हा काळ असतो. शरीर, मन, बुद्धी या वयात आपल्या कार्यक्षमतेच्या उच्चांकस्थळी असते.
प्रत्येकामध्ये सुप्त गुण एक राजहंस प्रत्येकामध्ये दडलेला असतो. बऱ्याचदा तो राजहंस आपल्याला माहिती नसतो. तो माहिती करून देण्यासाठी या मेधा महोत्सवाचा खूप उपयोग होणार आहे.
अनेकांना आपण चांगले गाऊ शकतो, बोलू शकतो, असा कलागुणांचा अविष्कार होण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून येथे येणारे मान्यवर तुम्हाला स्फूर्ती, प्रेरणा देतील. तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतील. अशी चांगली व्यक्तिमत्व तुमच्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून येथे येतील. मेधाचा अत्यंत चांगला महोत्सव या ठिकाणी पार पडत आहे.
