महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना महावितरणकडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे.
शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार केला. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अशा परिस्थितीत वीज बिलांच्या वसुलीसाठी नागरिकांवर दबाव आणणे योग्य नाही. तसेच थकीत बिलांच्या कारणास्तव दुष्काळग्रस्तांची वीज जोडणी तोडण्याची कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली.
जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना सातत्याने संघर्ष करत असून, दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांवर अन्याय झाल्यास पक्ष गप्प बसणार नाही. महावितरणने सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी; अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल, असा इशारा अमित चव्हाण यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख इम्तियाज शेख, शहरप्रमुख फैसल सय्यद, तालुका संघटक राजू सातपुते, शहरसमन्वयक असिफ तांबोळी, उपशहर प्रमुख कैलास गायके, लिंगमुर्ती चिंता, विभागप्रमुख विजय भागवत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.