अहिल्यानगर दि. ०४ –
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जाहीर केल्याप्रमाणे पुतळ्यासाठी तातडीने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तांबे यांनी समितीच्या बैठकीत केली असता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचा निधी देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या संदर्भात काय उपाययोजना करता येऊ शकते यासाठी सरकारकडे देखील मार्गदर्शन मागविल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
संगमनेर मध्ये बस स्थानकाच्या जागेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय सध्या राजकारणात अडकल्याचे दिसत आहे.
नुकत्याच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार तांबे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित करत मागील चार महिन्यापासून जाहीर करण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीबाबत कोणतीही कार्यवाही का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी वरील माहिती दिली.
दरम्यान तांबे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सरकारने एक कोटी रुपयांचा निधी द्यावा तसेच निधी देता येणे शक्य नसेल तर नगर परिषदेला याबाबत कळवावे म्हणजे नगर परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीमधून अश्वारूढ पुतळा साठी निधीची उपलब्धता करता येईल.
या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासन स्तरावर लवकर निर्णय घेऊ असे सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहीद स्मारक व १०० फुटी तिरंगा ध्वजही उभारणार…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर मध्ये निर्माण झालेल्या हायटेक बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळील जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा निर्माण केला जाणार आहे. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या पुतळ्याच्या जागेवर त्यांचा पूर्ण कृती पुतळा निर्माण केला जाणार आहे. याशिवाय शहीद स्मारक आणि शंभर फुटी तिरंगा ध्वजही उभारण्यात येणार आहे. – सत्यजित तांबे, आमदार.