मुंबई दि. ०५ फेब्रुवारी –
मतदार संघात पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज, आरोग्य सेवा आणि ग्रामपंचायतींच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्यांसंदर्भात चर्चा करत मतदारसंघातील गावांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित योजना मंजूर करून निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.
आमदार खताळ यांनी बुधवारी (०५फेब्रुवारी) मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
ग्रामस्थांच्या गरजा आणि स्थानिक प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जातील, असेही खताळ यांनी सांगितले.