दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानचा मोठा निर्णय, गुन्हेगारी नियंत्रणात येण्याचा केला दावा; आता…
यापूर्वी मोफत भोजनासाठी थेट प्रसादालयात प्रवेश दिला जात असल्यामुळे शिर्डीमध्ये भिक्षेकऱ्यांची आणि गुन्हेगाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण समोर आल्याने या सुविधेचा गैरवापर होऊन शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोप माजी खासदार सुजय विखे यांनी केला होता.


शिर्डी, दि. ०६ फेब्रुवारी –
साई दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या साई भक्तांना आता दर्शन रांगेतच मोफत प्रसाद भोजन कुपन मिळणार आहे. तसेच, संस्थानच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कूपन वितरित केले जाणार आहे.
दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थांचे यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी साई संस्थानच्या प्रसादालयात थेट प्रवेश मिळत असे. ज्यामुळे मोफत जेवणासाठी कुणालाही सहज प्रवेश करता येत होता.
यापूर्वी मोफत भोजनासाठी थेट प्रसादालयात प्रवेश दिला जात असल्यामुळे शिर्डीमध्ये भिक्षेकऱ्यांची आणि गुन्हेगाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण समोर आल्याने या सुविधेचा गैरवापर होऊन शिर्डीत भिक्षेकरी आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोप माजी खासदार सुजय विखे यांनी केला होता. विखे यांच्या या आरोपानंतर मोठा गदारोळदेखील माजला होता.
मात्र दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने मोफत भोजनाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या निर्णयामुळे भक्तांना अधिक सोय आणि सुव्यवस्था मिळणार आहे. यापूर्वी साई संस्थानच्या प्रसादालयात मोफत जेवणासाठी थेट प्रवेश देण्यात येत असे, परंतु या व्यवस्थेमुळे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. दर्शन रांगेत असलेल्यांना रांगेतच आणि भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांना भक्तनिवासातूनच भोजनाचे कूपन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या निर्णयामुळे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल, असा दावा केला जात आहे. शिर्डीतील नुकत्याच घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने हे पाऊल उचलले आहे. हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने आणि भक्तांच्या सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.