मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित केला होता. शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत या जनता दरबारावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ देखील उपस्थित होते.
शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमात मंत्री शंभुराजे देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर यांनी राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने निर्णय घेतले.
सामान्य जनतेला थेट शासनाशी जोडण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार शिवसेनेचे मंत्री बाळासाहेब भवन येथे जनतेसाठी उपलब्ध राहणार आहेत. या दरबारात नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेण्यात येत असून, प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने मदत केली जात आहे.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असून, लोकांना थेट शासनस्तरावर संवाद साधण्याची संधी मिळत आहे. शिवसेनेच्या या पुढाकारामुळे लोकांमध्ये समाधानाची भावना निर्माण होत आहे, अशी भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.