मुंबई, दि. ११ फेब्रुवारी –
मंगळवारपासून (११ फेब्रुवारी) राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ११ ते १८ मार्च दरम्यान ही परीक्षा होत आहे. राज्यभरातून या परीक्षेला पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे जात आहे.
यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. याशिवाय या परीक्षेला ३७ तृतीयपंथीयांनी देखील नोंदणी केली आहे.
महाराष्ट्रात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
शाखा निहाय परीक्षार्थी संख्या – विज्ञान शाखेला ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला ३ लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत, अशी माहिती माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शरद गोसावी म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाअंतर्गत बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा १० दिवस अगोदर होत आहे. ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल, १५ मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. तर मागील पाच वर्षाच्या काळात ८१८ केंद्रावर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास, पुणे १२५, नागपूर १०४, छत्रपती संभाजीनगर २०५, मुंबई ५७, कोल्हापूर ३९, अमरावती १२४, नाशिक ८८, लातूर ७३, कोकण ३ ही एकूण ८१८ केंद्र आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून कॉपीमुक्त अभियनासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोन फिरवले जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची एफसीआरव्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

