संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी –
संगमनेरमधील साहित्यिक व संगमनेर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक मा. रा. लामखडे यांना यंदाचा विद्रोही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण शनिवारी (२२ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण साहित्य चळवळीतील बहुमोल योगदानाबद्दल लामखडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लामखडे हे सुरुवातीपासूनच ग्रामीण साहित्याच्या चळवळीत सहभागी राहिले आहेत. विद्यापीठ पातळीवर ग्रामीण साहित्याचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून त्यांनी आग्रह धरला.
त्यांच्या पुढाकारानेच पहिले ग्रामीण साहित्य संमेलन संगमनेर तालुक्यातील बोटा या गावी १९७९ मध्ये भरविले गेले होते. दलित आदिवासी ग्रामीण सभेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी मोलाचे कार्य केले. धारावी येथे भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात देखील ते सक्रिय राहिले.
राष्ट्रसेवा दलाचे निष्ठावंत सैनिक, समाजवादी चळवळीतील सत्यशोधक साथी, परिवर्तन सन्मुख विद्यार्थी घडवणारे प्राध्यापक, मराठीचे व्यासंगी शिक्षक, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. त्यांची वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
ग्रामीण साहित्य चळवळीत बहुमोल योगदान देणाऱ्या या जेष्ठ साहित्यिकाचा आणि विचारवंताचा आम्ही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करत आहोत याचा आम्हाला विशेष आनंद होत असल्याची भावना पुरस्कार निवड समितीचे सदस्य आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे साथी किशोर ढमाले यांनी व्यक्त केली.

