संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी
आधीच शेतमालाला भाव नाही त्यातच डाळिंबाच्या शेतातून चारशे ते पाचशे किलो डाळिंब चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरालगच्या सुकेवाडी येथे हा प्रकार घडला.
शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संजय बबन सातपुते (वय ३०, धंदा शेती, रा. खांजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुकेवाडी येथील एका मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी, फिर्यादी संजय सातपुते यांचे सुकेवाडी (संगमनेर) येथे डाळिंबाचे शेत आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) ते दुपारच्या वेळी शेतात आले असताना त्यांना गावातील मुलगा शेतातून त्यांच्या संमतीशिवाय डाळिंब तोडून घेऊन जात होता. फिर्यादीला बघून बांधावरून पळत असताना त्याचा पाय घसरून तो पडला. आरोपीने सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीचे ४०० ते ५०० किलो डाळिंब चोरून नेल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
शहर पोलिसांनी आरोपी विरोधात शनिवारी गुन्हा रजिस्टर नंबर १२८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार टोपे करत असल्याची माहिती देण्यात आली.


आधीच शेतमालाच्या भावाची बोंब, त्यातच शेतातून चोरले चारशे-पाचशे किलो डाळिंब, गुन्हा दाखल
फिर्यादीच्या संमतीशिवाय डाळिंब तोडून घेऊन जात होता. फिर्यादीला बघून बांधावरून पळत असताना त्याचा पाय घसरून तो पडला.

