
संगमनेर, दि. २५ फेब्रुवारी
संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी पकडलेला आरोपी ज्या ग्रामपंचायतमध्ये काम करत होता त्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांकडे बनावट नोटासंदर्भात चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
बनावट नोटांसाठी वापरण्यात येणारा कागद संगमनेरमध्ये कुरिअर मार्फत प्राप्त झाल्याची माहिती पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होते. या अधिकाऱ्यांसह संगमनेरच्या स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईत नोटा छापण्यासाठीचा मुद्देमाल आणि काही खराब फाडलेल्या नोटा पथकाला आढळून आल्या होत्या. कारवाई दरम्यान पकडण्यात आलेला आरोपी रजनीकांत राहणे दहा वर्षापासून गुंजाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून काम करीत आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार तो सांभाळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहर पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी अटक केलेल्या रहाणे याला शुक्रवारी (२१) न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. आज मंगळवारी ही मुदत संपत आहे.
पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन बनावट नोटा प्रकरणी रजनीकांत राहणेबाबत अधिक तपास केला. रहाणे यांने बनावट नोटा चलनात आणल्या होत्या का, अथवा ग्रामपंचायतीत बनावट नोटाचे काही माहीती, पुरावे मिळतात का या संदर्भात तपास केला. मात्र, बनावट नोटाबाबत ग्रामपंचायतीमध्ये राहणे याने कुठलेच आक्षेपार्ह काम केल्याचे तपासात आढळून आले नसल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले असल्याचे पुढारीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.


