

संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर नगर परिषदेजवळ असलेल्या माळीवाडा येथे असलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा मंत्र देणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या जागी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला जाणार आहे. यासाठी सरकारकडे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
तांबे म्हणाले, येत्या काही दिवसात संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सध्याच्या पुतळ्याच्या जागी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सध्याच्या पुतळ्याच्या जागी भव्य शहीद स्मारक उभारण्यात येणार असून याच परिसरात भव्य तिरंगा देखील उभारला जाणार आहे. 

आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. शिंदे यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निधी मंजूर होताच येत्या काही दिवसात फुले दांपत्याचा देखील पूर्णाकृती पुतळा उभा केला जाईल.
महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समतेचा संदेश जगाला दिला असून तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी माळीवाडा येथे १९९३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला होता. आता याच जागेवर पूर्णाकृती पुतळा उभा राहणार असल्याने शहराच्या वैभवात आणखी भर पडेल.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरांमध्ये विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. विविध अद्यावत प्रशासकीय इमारतींबरोबर बाह्यवळण मार्ग, संगमनेर शहरासाठी चोवीस तास पाणी, गंगामाई घाटाचे सुशोभीकरण, रस्त्यांचे जाळे, विविध गार्डनची निर्मिती, शैक्षणिक सुविधा, सामाजिक सलोखा आणि भरलेली बाजारपेठ यामुळे संगमनेर हे वैभवशाली शहर ठरले आहे. शहरात महापुरुषांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांचे माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.


