महाराष्ट्र संवाद न्यूज
दागिने चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून या दागिने चोरांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. पोलिसांना दागिने चोरांचा शोध लागत नाही की पोलीस चोरांचा शोध घेत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

नाशिकच्या जेलरोड परिसरात एका वृद्ध महिलेची तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या भामट्यांनी महिलेला धमकावून तिच्याकडील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शिवमंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होती. नारायणबापूरोडने पायी जात असताना रेणुका हॉस्पिटलजवळ सार्वजनिक उद्यानाजवळील दोन अनोळखी व्यक्तींनी तिला आवाज देऊन थांबवले. त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगून महिलेला तिच्या गळ्यातील आणि हातातील सोन्याच्या दागिन्यांवरून भीती दाखवली. “येथे सोन्यामुळे एकाचा खून झाला आहे, तुम्ही एवढे सोने घालून का फिरता?” असे बोलून त्यांनी महिलेला दागिने काढून त्यांच्याकडे देण्यास सांगितले. ते दागिने व्यवस्थित ठेवण्याचे आमिषही त्यांनी दाखवले.

भयभीत झालेल्या वृद्धेने आपल्या अंगावरील ५६ ग्रॅमचे मंगळसूत्र, १२ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या आणि ४ ग्रॅमची अंगठी असे एकूण सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने त्या तोतया पोलिसांच्या हवाली केले. यानंतर त्या भामट्यांनी एक कागद काढून त्याचा बोळा बनवून महिलेच्या पर्समध्ये ठेवला आणि तिला काळजी घेण्यास सांगून तेथून निघून गेले.
घरी पोहोचल्यावर महिलेने पर्समधील कागदाचा बोळा उघडला असता, त्यात दागिने नसल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने तातडीने उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे करत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या तोतया पोलिसांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.



