अहिल्यानगर
पोलिस कारवाईतून सुटका व्हावी आणि अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चक्क दोन लाख रुपये उकळणाऱ्या एका शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

४ एप्रिल रोजी पाथर्डी पोलिसांनी एका तक्रारदाराच्या टपरी व्यवसायासाठी लागणारी सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा त्याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमधून जप्त केला होता. ही कारवाई सुरू असतानाच तक्रारदाराला एका ओळखीच्या व्यक्तीने विजय गर्जे या शिक्षकाला भेटण्याचा सल्ला दिला. या भेटीत गर्जेने तक्रारदाराला सांगितले की, त्याच्या भावावर मोठ्या कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ नये आणि तपासात मदत मिळावी यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकांना दोन लाख रुपये द्यावे लागतील.
गर्जेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने ५० हजार रुपये पाठवले. यानंतर नातेवाईकांच्या खात्यावरून आणखी एक लाख रुपये असे एकूण दीड लाख रुपये गर्जेला दिले.
दरम्यान, १५ एप्रिल रोजी तक्रारदाराने गर्जेला फोन करून भावाच्या अटकपूर्व जामिनाबद्दल विचारणा केली. त्यावेळी गर्जेने तक्रारदाराला सांगितले की, उर्वरित ५० हजार रुपये सहाय्यक पोलिस निरीक्षकांना देऊन विषय मिटवून टाक. जर पैसे दिले नाहीत, तर पोलिस त्याच्या भावाला अटकपूर्व जामीन मिळू देणार नाहीत आणि त्याला अटक करतील, अशी धमकीही गर्जेने दिली.

या सततच्या मागणी आणि दबावाला कंटाळून तक्रारदाराने अखेरीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
काल, रविवारी पोलिसांनी सापळा लावून विजय गर्जे याला उर्वरित ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलिस अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, दशरथ लाड आणि पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, हारुण शेख यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

या घटनेमुळे खळबळ माजली असून, एका शिक्षकाने अशा प्रकारे गैरकृत्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

