
अहिल्यानगर –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे धनगरी काठी, घोंगडी, अहिल्यादेवींची मूर्ती आणि पुस्तक देऊन पारंपरिक स्वागत केले.
मंत्र्यांसाठी खास कांस्य धातूच्या थाळी-वाट्यांमध्ये पुरणपोळी, आमरस, शिपी आमटी, मासवडी अशा १८ पदार्थांची मेजवानी असून कर्जतची खास ओळख असलेली शिपी आमटी स्थानिक महिलांकडून तयार करून घेण्यात आली. एका कास्य थाळीची किंमत ३,९९९ रूपये आहे.

ग्रामीण भागात पहिल्यांदाच होत असलेल्या या बैठकीसाठी चौंडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे स्वतः दोन दिवसांपासून येथे तळ ठोकून होते. या सर्व व्यवस्थेसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ हजारापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून तैनात करण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठक व्यवस्थेकडे सुरक्षा पास असल्याशिवाय कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सूतगिरणीचे भूमिपूजन झाले आणि त्यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाला भेट दिली.


