महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला जामखेडमध्ये बोलावून लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दरोड्यात व्यापाऱ्याकडून दहा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. पोलिसांनी तत्पर कारवाई करत या टोळीतील तीन सदस्यांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिलीप मैड (वय ३५, रा. आश्वी, ता. संगमनेर) यांना अश्विनी नावाच्या महिलेने १५० ग्रॅम सोने १० लाख रुपयांना देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार मैड हे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे गेले असता, अश्विनी आणि तिच्या ८ ते १० साथीदारांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील १० लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास पथके तयार करून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान, हा गुन्हा विकास काज्या काळे, जरेणी विकास काळे (दोघे रा. पोंदवडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), वनिता रामचंद्र पवार (रा. सरदवाडी, ता. जामखेड) आणि सोन्या शिवाजी काळे (रा. सदफडोह, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी आपल्या साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. हे आरोपी जवळा (ता. जामखेड) येथे येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचला.

१५ मे रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सोन्या शिवाजी काळे (वय २८), अभित्या शिवाजी काळे (वय ३२, दोघे रा. सराफडोह, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि शुभम रामचंद्र पवार (वय १८, रा. सरदवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


