प्रतिनिधी, संगमनेर –
ऊस आणि दूध ही शाश्वत पिके असून, संगमनेर तालुका एक कुटुंब आहे आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत, आगामी काळात एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठीच्या पहिल्या मिल रोलर पूजनावेळी थोरात बोलत होते.

या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लता गायकर, सुंदराबाई डूबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
परमेश्वराच्या आशीर्वादाने कारखाना आणि सहकारी चळवळ चांगली प्रगती करत असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी साखर कारखानदारीतील प्रत्येक हंगाम हा आव्हानात्मक आणि कष्टाचा असतो यावर भर दिला. व्यवस्थापन, अधिकारी आणि कर्मचारी हे सर्व एका कुटुंबाप्रमाणे काम करतात आणि प्रत्येकाने आपले काम चोख केल्यानेच यश मिळते, असे ते म्हणाले. शरीराच्या अवयवांप्रमाणे कारखान्याचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असतो. हाफ सीजनमध्ये सतर्क राहून प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढले पाहिजे यासाठी ऊस विकास मेळाव्यांचे आयोजन सुरू आहे. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने लागवड करण्याचे आवाहन करतानाच थोरात यांनी आगामी काळात एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले. ८६०३२ ऊस नव्या तंत्रज्ञानानुसार १२ ते १३ महिन्यांत काढणीसाठी येऊ शकतो, कमी पाणी, कमी श्रम आणि जास्त उत्पादन या तत्त्वांचा अवलंब करून कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत असे म्हणाले.

उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात शेतकरी, सभासद आणि कर्मचारी सर्व मिळून एकत्रितपणे चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी यावर्षी कार्यक्षेत्रात ऊस कमी असल्याने मोठे आव्हान असल्याचे नमूद केले. चांगला भाव देण्यासाठी कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. कारखान्याने ऊस उत्पादन वाढीसाठी विविध अनुदान योजना सुरू केल्या असून, सेंद्रिय खत देखील उपलब्ध करून दिले आहे. आगामी गाळपाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मशीनचे ओव्हर ऑइलिंग, ऊस तोडणी, वाहतूक आणि मजूर यांसारखी सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी विष्णू ढोले, रामनाथ शिंदे, नामदेव शिंदे, बाबजी वामन, संभाजी वाकचौरे, शिवाजी जगताप, प्रा. बाबा खरात, अनिल सोमणी, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, भाऊसाहेब खर्डे, अशोक कवडे आदींसह सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.


