स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत राहुरी येथील घरफोडीसह पाथर्डी तालुक्यातील दुचाकी व मंगळसूत्र चोरीचे तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोहन अनिल उर्फ यासीनखाँ भोसले (वय २०, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) या सराईत गुन्हेगाराला अटक केली असून, त्याचे इतर तीन साथीदार सध्या फरार आहेत.
२५ ऑगस्ट २०२६ रोजी राहुरी फॅक्टरी परिसरातील शाहुल जॉन वंजारे यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहन भोसले याचा माग काढला आणि २८ ऑगस्ट रोजी त्याला गोंडेगाव परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवत सखोल चौकशी केली असता, रोहनने आपले साथीदार गुलब्या शिवाजी भोसले, राजेश इंदोर भोसले (दोघे रा. नेवासा) आणि गुण्या उर्फ सलमान बिंटू काळे (रा. कर्जत) यांच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. याच चौकशीदरम्यान या टोळीच्या आणखी गुन्ह्यांचा उलगडा झाला. मागील आठवड्यात या टोळीने पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथून दोन मोटारसायकली चोरल्या होत्या, तसेच माळीबाभूळगाव शिवारात एका घरासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रही ओरबाडून नेले होते. आरोपीच्या या कबुलीमुळे पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेला आरोपी रोहन भोसले हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी शिर्डी, शेवगाव आणि नेवासा पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडीचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी त्याला राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस सध्या त्याच्या फरार साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. ही धडक कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे.