संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या सात दिवसीय शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार-प्रसारासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्यास खरी क्रांती घडते, असे प्रतिपादन केले.

हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराजांचे उत्तराधिकारी टेंबे स्वामी महाराज, आमदार अमोल खताळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि हरी ओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
शिवगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीमुळे असेच रामराज्य आले आहे. प्रत्येकाने आपल्या अंतकरणात हिंदू धर्माची मशाल पेटवून ठेवली पाहिजे. तसेच, साधुसंतांनी दिलेल्या संस्कारांचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा प्रयागराज कुंभापेक्षाही भव्य होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी टेंबे स्वामी महाराजांचे संगमनेर ते धांदरफळ अशी मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले आणि गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रामेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेकही करण्यात आला. ही शिवपुराण कथा यशस्वी करण्यासाठी हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्या सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी असून, या धार्मिक कार्यक्रमातून प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे सांगितले. हिंदू धर्माच्या कार्यासाठी आपण कायमस्वरूपी भक्कम उभे राहू आणि रामेश्वर परिसराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
टेंबे स्वामी महाराजांनी माणसाच्या जन्माचा मूळ हेतू एकमेकांना समजून घेणे आणि सेवा करणे हा असल्याचे सांगितले. सद्गुरु अण्णा महाराजांनी समाजाच्या सेवेसाठी ७० वर्षे चंदनासारखे झिजून आपल्याला आनंद दिला, पण समाज कुठेतरी हा हेतू विसरत चालला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


