
गुरुवार, 19 जून: संगमनेर
संगमनेर शहरात ATM फसवणुकीचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएममधून पैसे काढताना पिन नंबर पाहून कार्ड बदलून 35,100/- रुपयांची फसवणूक केल्याची ही घटना बुधवारी समोर आली.
रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा (गु.र.नं. 558/2025, बीएनएस कलम 318(4) प्रमाणे) दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं? बुधवार, 18 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास संगमनेर येथील जाणता राजा मैदानाजवळ असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये ही घटना घडली. रहिमपूर येथील शेती व्यावसायिक शिवाजी देविचंद साबळे (वय 48) हे एटीएममधून पैसे काढत होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा एटीएम पिन नंबर चोरून पाहिला.

या अज्ञात भामट्याने पुढच्याच क्षणी साबळे यांच्या हातातून एटीएम कार्ड घेतलं आणि तुमचं कार्ड ओलं झाल्यामुळे पैसे निघत नाहीत, मी पुसून देतो, असं सांगून मोठ्या चलाखीने त्यांचं एटीएम कार्ड बदलून टाकलं. साबळे एटीएममधून बाहेर पडल्यानंतर, त्या अज्ञात आरोपीने बदललेल्या एटीएम कार्डचा वापर करून साबळे यांच्या संमतीशिवाय तब्बल 35,100/- रुपये काढून घेतले.
अज्ञात भामट्याकडून या घटनेत साबळे यांचं युनियन बँकेचं एटीएम कार्ड आणि त्या कार्डच्या माध्यमातून बँक खात्यातील 35,100/- रुपयांची फसवणूक झाली आहे.
पोलीस तपास सुरू: याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस हवालदार टोपे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आवाहन: नागरिकांनी एटीएम वापरताना अधिक सावधगिरी बाळगावी, आपला पिन नंबर कोणालाही दिसू नये याची काळजी घ्यावी आणि अनोळखी व्यक्तींकडून मदत घेणं टाळावं, असं आवाहन संगमनेर पोलिसांनी केलं आहे.


