बुधवार, दि. २५ जून – अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा शाळेच्या आवारात बुधवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने हल्ला करून खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी आणि आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन आरोपीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात आरोपीने चाकूहल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विधीसंघर्षग्रस्त बालकाला (आरोपी) ताब्यात घेतले आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा हिंसक घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली असून, शाळा प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


